Thursday, April 1, 2010

मनसेच्या कामगार नेत्यांमध्ये शीतयुद्ध

सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 01, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: ms, politics, thane, mumbai

ठाणे - बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीनंतर कल्याणच्या सुभेदारीसाठी लढाई होणार आहे. त्यापाठोपाठ ठाण्याच्या किल्ल्याच्या लढाईला सुरुवात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी ताकद वाढविण्यास सुरुवात केली, पण या वातावरणात एक प्रमुख लढवय्या पक्ष असलेल्या मनसेमध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचे चित्र आहे. कामगार संघटक व कामगार नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

राजकीय पक्षाच्या गटातटासाठी ठाण्यातील कोणताही पक्ष अपवाद नाही. कमी-अधिक संख्येने प्रत्येक पक्षात गट तट कार्यरत आहेत. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष आदी कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. विशेष म्हणजे एकहाती चालणारा पक्ष म्हणून ओळखली जाणारी मनसेही त्याला अपवाद राहिलेला नाही. त्याचा प्रत्यय मनसेच्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये येत असतो. एका गटाची पत्रकार परिषद अथवा कार्यक्रम असल्यावर दुसऱ्या गटाचे पदाधिकारी तेथे उपस्थित राहण्याचे टाळतात. हीच परंपरा आंदोलनातही सुरू ठेवण्यात आली आहे. अशा वातावरणात मनसेच्या कामगार सेनेचे संघटक मनोज चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना पाठविलेले पत्र चर्चेचा विषय ठरला आहे. या पत्रात त्यांनी थेट कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही, पण त्याच वेळी मनसेची कामगार सेना ही पक्षाची अधिकृत संघटना आहे. इतर कोणत्याही कामगार संघटनेचा त्याबरोबर संबध नाही, त्यामुळे इतर संघटनांच्या आंदोलनात अथवा मोर्चामध्ये मनसेची ताकद वापरू नये, असा सल्ला या पत्रात दिला आहे. शहराध्यक्ष हरी माळी यांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. तसेच ही माहिती सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्यास सांगितले आहे.

आजच्या घडीला ठाण्यात मनसेचे कामगार नेते म्हणून राजन राजे हे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आंदोलनात पक्षाचे काही पदाधिकारी आवर्जून उपस्थित असतात. या पदाधिकाऱ्यांबरोबरच मनसेच्या इतर कार्यकर्त्यांना राजन राजे यांच्या कामगार संबंधित आंदोलनात सहभागी न होण्याची दिलेली तंबी म्हणून या पत्राकडे पाहिले जात आहे. या पत्रामुळे राजेविरोधी गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे; तर त्यांचा समर्थक गट मात्र राजन राजे यांच्यामुळे मनसेची नाळ कामगारांबरोबर जुळली जात असताना त्याला अटकाव का, असा प्रश्‍न उपस्थित करीत आहेत.

याबाबत राजन राजे म्हणाले, 'माझी कोणतीही वैयक्तिक संघटना नाही. कंत्राटी अथवा तथाकथित कायम कामगारांच्या अंतर्गत युनियनने बोलावले तरच मी संबंधित कंपनीत जातो. माझ्याकडे शेवटची आशा म्हणून कामगार येतात. आजच्या घडीला सचोटीने कामगारांचे नेतृत्व करणारा नेता उरलेला नाही. सचोटीने कामगारांना न्याय मिळवून देणे माझे धर्मकर्तव्य आणि पिंड आहे. भगवान श्रीकृष्णाला मी गुरू मानले आहे. माझ्या क्षमतेत राहून मला माझे काम करीतच राहावे लागणार आहे.''

या प्रतिक्रियेवरून मनसेच्या कामगार संघटकांनी पदाधिकाऱ्यांना राजेसोबत न जाण्याचे आवाहन केल्यावरही राजन राजे यांचे कामगार क्षेत्रातील काम वेगानेच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भावी काळात हा संघर्ष अधिक पेटण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment